C/o Kancharapalem: फिल्मी Love Stories च्या पलीकडलं काही !

ही तेलगू फिल्म २०१८ मधली आहे. पण ती २११८ मध्ये पाहिली तरी तितकीच ताजी वाटेल. याचं कारण वरकरणी साध्या वाटणाऱ्या त्या गोष्टीतला अस्सलपणा. वयाच्या विविध टप्प्यावर घडणाऱ्या या चार प्रेमकथा आहेत. सिनेमा घडतो तो आंध्र प्रदेशातील कांचरपालेम नावाच्या एका छोट्या गावात. यातली एकही प्रेमकथा गोड गुलाबी नाही. या प्रत्येक प्रेमकथेत odds जास्त आहेत. वय, कुटुंब, धर्म, जात, पेशा हे अनेकांच्या अस्मितेचे मानबिंदू असतील, पण इथे नेमके तेच मुद्दे या प्रेमाच्या आड आलेत. त्या चारही गोष्टी इथे सांगण्यात गंमत नाही. त्या प्रत्यक्ष पाहण्यातच गंमत आहे.

(मला तरी) तेलगू येत नसल्याने Subtitles वाचत वाचत आपण हा सिनेमा पाहू लागतो. मग हळूहळू शब्द मागे पडतात आणि त्या माणसांचे डोळे आपल्याशी बोलू लागतात. कुठल्याही लिपीत न लिहिता येणाऱ्या अशा एका अनाम भाषेत सिनेमातली ती पात्रं आपल्याशी बोलू लागतात. आपण त्यांच्यासह हसतो, त्यांचं दुःख आपल्याला आपलं वाटतं. त्यांच्या अडचणीत ‘पुढे काय ?’ म्हणत आपणच हादरून जातो. कुठली असते ही भाषा ? ही भाषा असते माणसांची ! तेलगू येत नसूनही तुम्ही कांचरपालेम नावाच्या त्या छोट्याशा गावातल्या साध्यासुध्या माणसांच्या भावविश्वात गुंतत जाता हे या सिनेमाचं यश आहे.

महा वेंकटेश (काही ठिकाणी वेंकटेश महा असंही लिहिलंय.) या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. इतकंच नाही, तर या सिनेमातील ऐंशी टक्के कलाकार कांचरपालेम याच गावातील रहिवासी असून त्यांनी आयुष्यात सिनेमात पहिल्यांदाच अभिनय केलाय, म्हणे! सिनेमाचं संगीतही खूप खास आहे. चित्रपट भाषेत ज्याला montage (मोंटाश) म्हणतात त्या स्टाईलमध्ये येणारी दोन तीन गाणी तर भन्नाट आहेत. (येनी जन्मनु, आशा पाशम, पट्टी पट्टी,) त्यामुळे सिनेमा पाहताना गाणी ‘स्कीप’ न करता पहावीत ही विनंती !

सिनेमाचा शेवट ! काय बोलू ! या सिनेमाची शेवटची पाच मिनिटं हा या संपूर्ण सिनेमाचा प्राण आहे. फक्त सिनेमाच्या या शेवटावर एक वेगळा लेख होऊ शकेल ! संपूर्ण सिनेमा पाहताना ‘असून असून काय असेल वेगळा शेवट’ असा विचार यायचा. पण अतिशय संयमाने मी त्या शेवटच्या क्षणाकडे पोहोचलो. स्क्रीन फॉरवर्ड करत शेवटाकडे गेलो नाही, गुगल करून spoiler alerts पाहिले नाहीत याचं प्रचंड समाधान वाटलं ! सिनेमा संपला तेव्हा काही सेकंद मी नुसताच बसून राहिलो. सिनेमा नावाच्या व्हिज्युअल माध्यमावर पकड असणं म्हणजे काय आणि ते किती पॉवरफुल असू शकतं या विचाराने मी दिग्दर्शकासह संपूर्ण टीमला मनोमन दंडवत घातलं !

खरं तर खूप काही लिहायचा मोह आवरून इथेच थांबतोय.

तेव्हा मस्तपैकी नेटफ्लिक्सवर जाऊन राजू, सुंदरम, जोसेफ आणि गड्डामला भेटून या. या सर्वांचा पत्ता एकच – C/o Kancharapalem !

C/o Kancharapalem
Netflix
Duration: 140 Min

Leave a comment