१३ ऑक्टोबर: दोन आठवणी

१३ ऑक्टोबर १९८७

मी पाचवीत वगैरे असेन बहुदा. नोव्हेंबरमध्ये आमच्या गिरगावातल्या वाडीत आम्हा हौशी कलाकारांचं एक नाटक होणार होतं. त्याची संध्याकाळी रिहर्सल सुरू असताना आमचा डायरेक्टर निलेश केळकर आला आणि म्हणाला, ‘आज पुढची रिहर्सल होणार नाही. किशोर कुमार गेला.’ कोणी एक गायक गेला तर त्यात आपल्या नाटकाची रिहर्सल कॅन्सल करण्यासारखं काय इतकं?’ असा एक भाव घेऊन आम्ही सगळी लहान मुलं आपापल्या घरी गेलो. रात्री दूरदर्शनवर ती बातमी पुन्हा पाहिली. फर टोपी घातलेलं किशोरचं शव. बाजूला बसून रडणारी लीना चंदावरकर. कोसळलेला अमित कुमार. अश्रूंचा बांध फुटलेले दादामुनी. असं काही काही पुसट आठवतंय.
विसंगती पहा. प्रत्यक्षात त्या दिवशी काहीच नाही वाटलं. कारण ‘किशोर गेला’ म्हणजे काय झालं ते कळण्याचं वय नसावं बहुदा.. ‘किशोर गेला’ म्हणजे नक्की काय काय गेलंय ते आता वर्षागणिक जास्त कळत जातंय…..

कट टू

१३ ऑक्टोबर १९९३

अकरावीत होतो.
मी आणि माझा मित्र अतित डहाणूकर कॉलेजमधून चालत चालत पार्ले स्टेशनवर आलो. दुसऱ्या दिवशी कुठला तरी पेपर होता बहुतेक. संध्याकाळी ५ वाजता वातावरणात एक उदास काजळी आली होती. नेहमीच्या काळोखापेक्षा खूप वेगळी. पाऊस नव्हता. विचित्र हवा. चालता चालता अतितला म्हटलं – वातावरण जरा विचित्र वाटतंय ना ? Something is not right… असं ?
आम्ही आपापल्या घरी गेलो. घरी नेमकं कोणीच नाही. असं कधी शक्यतो व्हायचं नाही. तेव्हा मोबाईल नव्हते. मी आई बाबांच्या फोनची वाट पाहत बसलो. साडे सात आठला बाबांचा लँडलाईनवर फोन आला. ‘एक वाईट बातमी आहे. सुरेशकाका गेला ! उद्या तुझा पेपर आहे. तू गिरगावात येऊ नकोस. पण आम्ही आज इथे राहतोय.’ मला रडूच कोसळलं. गिरगावात आमचा शेजारी सुरेशकाका माझा अत्यंत लाडका काका होता. त्याला कॅन्सर झाला होता. पण तो आपल्यातून कायमचा गेलाय हे मानायला मन तयार होत नव्हतं. आज मी घरी एकटा राहणं शक्यच नव्हतं. मी अतितला फोन केला. त्याला घरी राहायला बोलावलं. अतित जेवून आला. पण नेहमीपेक्षा खूप उशिरा. प्रचंड पाऊस पडत होता.
धापा टाकत अतित घरी पोहोचला. तो खूप घाबरलेला. दारात उभ्या उभ्याच म्हणाला, आज एक खूप वाईट accident झालाय..लेडीज स्पेशल गाडीला आग लागलीय असं वाटून बायकांनी खाली उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या गाडीखाली त्यापैकी काही बायका गेल्या…त्यात ४० बायका गेल्यात ! सगळ्या स्टेशन्सवर केऑस आहे !
काही न बोलता बहुदा बराच वेळ आम्ही नुसतेच बसून राहिलो. Something is not right असं संध्याकाळीच वाटलेलं आम्हाला दोघांनाही आठवत राहिलं. सुरेशकाकाचं जाणं आणि लेडीज स्पेशल गाडीला झालेला अपघात हे सगळं त्यानंतर घडलं होतं. या प्रकारच्या intuition चा मला नंतर कधीही अनुभव आला नाही.

मला तारखा, वाढदिवस वगैरे लक्षात राहतात.
दरवर्षी १३ ऑक्टोबर आला की हे सगळं हटकून आठवतं. त्रासबिस होत नाही. उलट किशोर, सुरेश काका यांचं त्या निमित्ताने स्मरण होतं. सुरेशकाकाची एखादी आठवण येते. काही क्षण किशोरच्या एखाद्या गाण्याच्या ओळी नकळत गुणगुणल्या जातात. आत्ता लिहिता लिहिता सहज मनात आलं, माणूस गेल्यावर तो जितकी वर्ष त्याच्या कामातून जिवंत राहतो किंवा त्याच्या सहज स्मरणाने आनंद देत राहतो ते त्या माणसाचं खरं वय ! 

असो…आज १३ ऑक्टोबरच्या दुपारी अगदी तशीच काळोखी आली होती. ते सगळं पुन्हा आठवलं..आज पहिल्यांदा हे सगळं कुणाबरोबर तरी शेअर केलं…आता जरा आभाळ मोकळं झाल्यासारखं वाटतंय !



Leave a comment