शांततेचा आवाज…… बिखरने का मुझको शौक हे बड़ा….!

या गाण्याची आणि माझी ओळख झाली इन्स्टाग्रामच्या रील्समधून. तुम्हाला माहित्ये, रील्समध्ये फक्त सुरुवातीची काही सेकंदच ऐकू येतात आणि तुम्ही पुढे सरकला नाहीत तर पुन्हा पुन्हा तेच ऐकू येत राहतं. त्या वीस सेकंदांच्या गाण्याची आणि शब्दांची इतकी ताकद की त्या रीलने मला चार मिनिटं सतरा सेकंदाच्या गाण्याकडे खेचून नेलं. आणि मग काय ! प्रेमातच पडलो गाण्याच्या. पुन्हा किती वेळा ऐकलं त्याचा हिशोबच नाही.

बिखरने का मुझको शौक हे बड़ा
समेटेगा मुझको तू बता ज़रा

रात्रीची वेळ. एका शांत विशाल नदीच्या काठावर बसून पाहणाऱ्याला आत्ता फक्त दोनच गोष्टी दिसतायत.
पाण्यावर डचमळणारी तुमची होडी आणि त्या शांत नदीवर तरंगणारा पौर्णिमेचा चंद्र ! 

गाण्याचं picturisation न बघताही हे गाणं ऐकताना तुम्हाला होडीत बसल्यासारखं वाटेल. काही ठिकाणी तर तुम्ही स्वतः होडी वल्हवताय असंही वाटेल. ही कमाल त्या गाण्याच्या composition ची आणि music  arrangement ची. तुम्ही खूप वेगवेगळ्या काळातलं हिंदी सिनेमा संगीत ऐकलं असेल तर तुम्हाला हे गाणं ऐकताना एस डी बर्मन आठवतील, महम्मद रफी आठवतील, गाण्याचे शब्द ऐकून शैलेंद्र आठवतील. ज्या सिनेमातलं हे गाणं आहे, त्या अर्थाने हे गाणं जुन्या काळच्या एखाद्या टिपिकल गाण्याची, तेव्हाच्या गाण्यांच्या स्टाईलची नक्कल आहे. पण या गाण्याला नक्कल म्हणणं हा या गाण्याचा अपमान आहे. मला वाटतं सिनेमाच्या पलीकडे जाऊनही या गाण्याची स्वतःची एक ओळख आहे.

बिखरने का मुझको शौक हे बड़ा
समेटेगा मुझको तू बता ज़रा …… या ओळी ऐकताना मला चंद्रशेखर गोखल्यांची एक चारोळी आठवते.

घर
दोघांचं असतं.
एकाने पसरलं तर
दुसऱ्याने आवरायचं असतं. 

अशीच काही भावना मला या ओळींमध्ये दिसते. गाण्यात येणाऱ्या या ओळी तुम्ही नीट ऐका. ‘शौक’ शब्दाच्या आधी एक ऐसपैस जागा अतिशय naturally आल्ये. तिथे तो ‘शौक’ शब्द ‘शौक घेत म्हणता येतो. ही त्या चालीची गम्मत आहे. गाण्याच्या शेवटाकडे गळ्यातली ‘खर’ तशीच ठेवून शाहीद मल्ल्याने तो ‘शौक’ शब्द इतका गोड म्हटलाय की क्या बात है !

एरवी आपल्या stand up कॉमेडी मधून सरकारवर बोचरी टीका करणारा वरुण ग्रोव्हर इथे एका वेगळ्या रूपात दिसतो. वरूणने काय लिहिलंय गाणं ! गाण्याचं pictuarisation डोळ्यासमोर ठेवून  डूबती है तुझमें आज मेरी कश्ती, के आँखों में तेरी रात की नदी…. या पडद्यावरच्या images शब्दांमधून सहज येऊन जातात.

खो रहें है दोनों एक दूसरे में, जैसे सर्दियों की शाम में धुआँ
ये पानी भी तेरा आइना हुआ, सितारों में तुझको है गिना हुआ …  काय अप्रतिम लिहिलंय !

मी आधी म्हटलं तसं गाण्यात येणाऱ्या या सगळ्या इमेजेस पाहताना गीतकार शैलेंद्र आठवतात. पण शैलेंद्रची ही शैली सिनेमासाठी उतरवण्यातही वरुण ग्रोव्हरने आपली प्रतिभा पणाला लावल्ये. त्यामुळे या गाण्याच्या यशात वरुणचाही महत्त्वाचा वाटा आहे.

‘उडता पंजाब’मधलं ‘एक कुडी’ गाऊन प्रसिद्ध झालेल्या शाहीद मल्ल्याने हे गाणं फारच मनापासून म्हटलंय. गाणं ऐकताना काही जागा ऐकताना हटकून महम्मद रफींची आठवण यावी हे कदाचित ठरवून केलं असण्याची शक्यता आहे. पण दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि गीतकार या सर्वांची ‘व्हिजन’ समजून घेऊन ते गाणं आपलंसं करणं यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते. मला वाटतं, शाहीदने या गाण्यातून आपली प्रतिभा सिद्ध केलीय.

सध्याच्या संगीतकारांमध्ये अमित त्रिवेदी हा माझा अत्यंत आवडता संगीतकार आहे. कुठल्याही ठराविक  संगीतप्रकारात टाइपकास्ट न झालेला अमित त्रिवेदी आज चित्रपटसृष्टीतला एक Underrated पण सतत वेगवेगळे प्रयोग करणारा महत्त्वाचा संगीतकार आहे. अमितच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट रचनांमध्ये या गाण्याचा नंबर खूप वरचा असायला हवा. संगीतकाराला उत्तम शब्दांची जाण असणे किती महत्त्वाचे असते हे अमितने या गाण्यातूनही दाखवून दिलंय. पूर्वीच्या गाण्यांमध्ये कमी टेक्नोलॉजी आणि भरपूर मेलडी हे तंत्र अमितने या गाण्यात खूप अभ्यासाने आणलंय. या गाण्याचं music arrangement कोणी केलंय माहीत नाही. पण कमीतकमी वाद्यांचा वापर हीच या गाण्याची खरी शक्ती आहे. जुन्या सिनेमाची आठवण करून देणारे मधले म्युझिक पिसेस, गाण्यात निवडलेली वाद्यं, आपल्याच ‘धून’कीत वाजत राहणारे व्हायोलिन्सचे ऑब्लिगातोज् हे सगळंच अप्रतिमरित्या जमून आलंय.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय या गाण्याविषयीचं बोलणं पूर्ण होणार नाही. ते म्हणजे या गाण्यात वाजेलेलं सॉंग व्हायोलिन. पूर्वीच्या गाण्यांमध्ये गायक किंवा गायिकेच्या आवाजामागे एक व्हायोलिन वाजत असे. गाणं जसं गायलं जाईल अगदी तसंच ते व्हायोलिन गाण्याच्या मागून follow होत असे. गायक किंवा गायिकेला follow करणे हेच त्या व्हायोलिनचं काम. (संगीतकार प्रभाकर जोग हे यामधले भीष्माचार्य मानले जात असत. जोग साहेबांनी अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांमध्ये सॉंग व्हायोलिनिस्ट म्हणून भूमिका बजावली आहे.) या गाण्यात वाजलेलं सॉंग व्हायोलिन हेडफोन्स लावून ऐका आणि त्याचा आनंद घ्या. तुम्हाला गम्मत वाटेल पण गाणं संपताना वेगळ्या चालीत येणाऱ्या ज़रा….च्या मागे येणारं सॉंग व्हायोलिन हा माझा या गाण्यातला सर्वात आवडता तुकडा आहे !

प्रत्येक काळाचं एक गाणं असतं. त्या त्या काळाच्या गाण्यावर तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय घटनांच्या पाऊलखुणा उमटलेल्या असतात. बरीचशी गाणी ज्या काळात जन्म घेतात त्याच काळात लुप्त होतात. ती गाणी नंतर कधी ऐकू आली तर आंबलेल्या ताकासारखी वाटतात. ऐंशीच्या दशकात लोकांनी डोक्यावर घेतलेली भप्पी लहरींची गाणी आज ऐकताना जसं वाटतं तसं काहीसं. पूर्वीच्या काळी गाजलेलं मै बन की चिडियाँ आज ऐकताना प्रचंड बोअर होतं. पण काही गाणी काळाच्या फुटपट्टीत मावत नाहीत. ही गाणी नवीन किंवा जुनी नसतात. ही फक्त चांगली गाणी असतात. १९४९ साली आलेलं ‘आयेगा आनेवाला’ २०४९ साली सुद्धा तितकंच फ्रेश असेल. बिखरने का मुझको शौक हे बड़ा… या गाण्यालाही वृद्ध होण्याचा शाप कदाचित लागणार नाही, असं माझं मन सांगतंय. मेलडी आणि उत्तम अर्थपूर्ण शब्द हे preservatives ज्या गाण्यात असतात ती गाणी काळाच्या पुढे जाऊन टिकतात असं मला वाटतं.

अर्थात, बिखरने का मुझको शौक हे बड़ा म्हणत हे गाणं निर्माण करणारे हात या गाण्यापासून केव्हाच वेगळे झालेत. उन्हे समेटना है या नहीं, हे शंभर वर्षांनी इथे असलेल्या माणसांना ठरवू दे. सध्यातरी २०२३ मध्ये आपण या गाण्याचा मस्त आनंद घेऊया !   

हे गाणे तुम्हाला इथे ऐकता येईल…

Leave a comment