Actually…I met them: गुलज़ार यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने

आठवणी या जखमेसारख्या असतात असं म्हणतात. एकदा खपली निघाली की जखम वाहायची थांबत नाही. पण गुलज़ार आठवणी सांगतात तेव्हा त्या जखमाही सुगंधी होतात ! पेंग्विन पब्लिशर्सने आणलेले Actually… I met them हे पुस्तक गुलज़ार साहेबांच्या अशाच सुगंधी आठवणींचा खजिना आहे. एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. हे पुस्तक गुलज़ार यांनी स्वतः लिहिलेले नाही. गुलज़ार साहेबांनी सांगितलेल्या आठवणी संचारी मुखर्जी यांनी बंगालीत लिहिल्यात व नंतर महार्घ्य चक्रबोर्ती यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलंय. मी अर्थातच बंगाली वाचलेलं नाही पण गुलज़ार साहेबांची नेहमीची मार्मिक तरी खोल अशी narration style महार्घ्य यांनी इंग्लिश भाषेत छान उतरवलीय.

कोणाकोणाच्या आठवणी आहेत यात ?
बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी, सलील चौधरी, पंडित रवी शंकर, भीमसेन जोशी, बासू भट्टाचार्य, शर्मिला टागोर, सत्यजित रे, किशोर कुमार, हेमंत कुमार, पंचम, संजीव कुमार, सुचित्रा सेन….. आणि आणखी काही जण. (भीमसेन जोशी आणि संजीव कुमार हे दोघे सोडल्यास बाकी सर्व जण बंगाली आहेत. साहजिक आहे. हे लिखाण बंगाली पेपरसाठी असल्यामुळे ही शक्यता जास्त आहे.)
गुलज़ार साहेबांनी ज्यांच्यासोबत खूप जवळून काम केलंय त्यांच्या अनेक हृद्य आठवणी आपल्याला यात वाचायला मिळतात. पण हे सगळं ‘गुण गाईन आवडी’ या शैलीत नाही हे खूप चांगलं झालंय. त्या- त्या माणसांचे स्वभाव दोष, वाईट सवयी, वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या चुका याबद्दलही गुलज़ार साहेब त्यांच्या मार्मिक शैलीत सांगतात. त्यांना देवत्व बहाल न करता, तीही शेवटी माणसं होती, त्यांनाही चुका करायला आपण परवानगी द्यायला हवी या न्यायाने त्याबद्दल बोलतात. आणि अर्थातच ते गुलज़ार सांगत असल्याने ही सर्व व्यक्तिचित्रे अत्यंत अदबीने पेश केली गेली आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. गुलज़ार साहेब म्हणतात, ‘ही सगळीच माणसं इतकी मोठी आहेत की मी माझा मलाच चिमटा काढून स्वतःला आठवण करून देतो की मी यांना प्रत्यक्ष भेटलोय, यांच्यासोबत भरपूर काम केलंय…’ म्हणून पुस्तकाचं नाव Actually….I met them !

पुस्तकाचा वाचक म्हणून आणि गुलज़ार साहेबांचा चाहता असून या पुस्तकात काही उणिवा जाणवतात. मुळात हे लिखाण वृत्तपत्रातील स्तंभ म्हणून झाल्याने काही लेख खूप त्रोटक वाटतात आणि पटकन उरकल्यासारखे वाटतात. लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन देव बर्मन, मदन मोहन आणि अशा कितीतरी जणांच्या आठवणी यात का नाहीत, असंही मनात येतं.

गुलज़ार साहेबांचा मराठी साहित्य वर्तुळात मुक्त वावर होता-आहे. कुसुमाग्रज, ग्रेस, पुलं, शांताबाई शेळके आणि अशा अनेक मंडळींविषयी गुलज़ार साहेबांच्या नक्कीच आठवणी असतील. त्यामुळे गुलज़ार साहेबांनी बंगाली वाचकांसाठी उघडलेला आठवणींचा पेटारा मराठी वाचकांसाठी उघडावा यासाठी काही दिग्गज मराठी मंडळी पुढाकार घेतील का ?

ही सर्व व्यक्तिचित्रे वाचताना ज्याला trivia म्हणतात अशा अनेक गोष्टी कळतात. उदा. आनंद सिनेमा रिलीज झाल्यावर त्यातील संवाद प्रचंड लोकप्रिय झाले. गुलज़ार साहेबांच्या बहिणीनं सिनेमा पाहून त्यांना कळवलं की सिनेमांच्या क्रेडिट मध्ये त्यांचं नाव नाहीये. गुलज़ार खट्टू झाले पण ही तक्रार ऋषीदांना सांगण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती. पण ऋषीदांना जेव्हा हे दुसरीकडून कळलं तेव्हा रिलीज होऊन थोडेसेच दिवस झाले होते. देशात वितरित झालेली सर्व रिळे परत मागवण्यात आली. गुलज़ार साहेबांचे नाव टाकून पुन्हा नवी रिळे सर्वत्र वितरित करण्यात आली.

पण मला स्वतःला या पुस्तकाने काय दिलंय ते मला between the lines मध्ये सापडलं. सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व माणसांविषयी बोलताना त्यांचा तोल जराही ढळत नाही. त्यांची आयुष्याकडे पाहायची दृष्टी लक्षात घेता ते एखाद्याच्या वैगुण्यावरही हसत हसत बोट ठेवतात. क्वचित ठिकाणीच अमुक अमुक माणसाचं या वेळचं वागणं मला अजिबात आवडलं नाही असं स्पष्टपणे सांगतात. पण हे अगदी क्वचित.

दुसरं म्हणजे गुलज़ार साहेबांचा सिनेमा आणि साहित्य सृष्टीत जो काही ‘रुतबा’ आहे, त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी या माणसाने प्रचंड कष्ट घेतलेत, अपमान पचवलेत.
खूप आणि विविध वाचलंय. सातत्याने हात लिहिता ठेवलाय (याविषयी थोडं विस्ताराने नंतर कधीतरी !)
रात्रीच्या रात्री जागून पटकथा, संवाद लिहिलेत. सिनेमा सारख्या अत्यंत चंचल आणि प्रसिद्धीमुख अशा माध्यमात राहून स्वतःचा एक आब टिकवलाय. कधीही हिणकस काम न करता व्यवसायनिष्ठता जपलीय. या सगळ्या गोष्टी जपुनही सर्वार्थाने यशस्वी होता येतं हे गुलज़ार साहेब यांच्याकडे पाहून लक्षात येतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे यश, हा पैसा अत्यंत राजस मार्गाने उपभोगण्यासाठी स्वतःची तब्येत अतिशय उत्तम ठेवलीय. हे पुस्तक वाचताना जाणवतं की बिमल रॉय असतील, ऋषीदा असतील या सर्व गुरूंकडे फिल्म मेकिंग शिकता शिकता त्यांनी सर्वात महत्वाचं काय आत्मसात केलं असेल तर ते म्हणजे त्यांचं work ethic आणि आयुष्याकडे पाहण्याची सौन्दर्यदृष्टी ! म्हणूनच सिनेमा सारख्या तद्दन धंदेवाईक जगात राहूनही गुलज़ार साहेबांनी अभिजात साहित्याची कास कधीच सोडली नाही. या फिल्मी दुनियेत राहूनही ते स्वतः फिल्मी नाही झाले. त्यांनी त्यांचं एक पाऊल कायम या फिल्मी दुनियेच्या बाहेर ठेवलं. कदाचित म्हणूनच ते नेहमी कमळाच्या पानासारखे अलिप्त राहिले.

१७६ पानांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील नागपूरच्या विवेक रानडे यांनी छायाचित्रित केलेला गुलज़ार साहेबांचा देखणा फोटो या पुस्तकाची शोभा वाढवतो. पुस्तकातील या सर्व मंडळींचे जुने दुर्मिळ ब्लॅक अँड व्हाइट फोटो हेही एक आकर्षण आहे.

गुलज़ार चाहते हे पुस्तक वाचतीलच पण विशेषतः क्रिएटिव्ह क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे असे मला आवर्जून वाटते.

हार्डकव्हर पुस्तक अमेझॉनवर सवलतीत उपलब्ध आहे. किंडलवर देखील आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यांना स्पर्श करणाऱ्या गुलज़ार साहेबांना तुम्ही कसा स्पर्श करणार हे तुमचं तुम्ही ठरवायचं !

Leave a comment