माणसाला किती वस्तू लागतात ?

हा प्रश्न अनेक वर्षे पडत होता. पण याचं समाधानकारक उत्तर सापडत नव्हतं.
मधल्या काळात याविषयावर काही फिल्म्स पाहिल्या, वाचन झालं.
त्यावेळी Minimalism ही concept कळली. आपले कोकणातले पूर्वज (किंवा अगदी आजही) जसे राहात होते किंवा राहतायत त्याला हा एक इंग्लिश शब्द मिळाला ! 🙂 कोकणातल्या लोकांना त्याची ‘थिअरी’ करता आली नाही. ‘एक दांडीवर, एक Xडीवर’ असं चारचौघात बोलता न येणारं बोलण्यात आपण पटाईत आहोत. पण गोरे लोक त्याच्या मुळाशी गेले. थेट मानसशास्त्रापर्यंत. त्याचं documentation केलं. आकर्षक पद्धतीने आपल्यासमोर मांडलं.

लॉकडाऊनमध्ये वेळ होता. मी माझ्या वस्तूंची चक्क लेखी यादी बनवली. कपडे (मुख्य, आतले, रुमाल, मोजे), कामाच्या फाईल्स इथपासून ते अगदी मोबाईल चार्जर, स्टेशनरी, पेनड्राइव्ह, आधार कार्ड, पासपोर्ट इथपर्यंत. यात अर्थात पुस्तकं नाहीत. पण तीही कमी केली. गरज नसलेल्या अर्थातच अनेक गोष्टी त्यात होत्या. मनावर दगड ठेवून वगैरे काय म्हणतात..यातलं जे शक्य होतं ते कमी केलं. काही टाकून दिलं. काही गरजूंना दिलं.

लॉकडाऊन मध्ये तशाही कमी वस्तू लागत होत्या. खरी कसोटी नंतर होती. पण तरीही बऱ्यापैकी तग धरून आहे.

नुकतेच आम्ही आमच्या redeveloped घरात शिफ्ट झालो. ७ वर्षं भाड्याच्या घरात मी आणि माझी बायको एक कपाट शेअर करत होतो. आता प्रत्येकाला स्वतंत्र कपाट मिळाल्यानंतर माझं कपाट जसं दिसतंय त्याचा फोटो सोबत दिलाय. हे रोज असंच असतं. त्यात एक खण चक्क रिकामा आहे ! मी आता माझ्या १४० वस्तूंवर आलोय. त्या कमी आहेत की जास्त आहेत हा मुद्दा नाही. माझ्याकडे काय काय आहे याबाबत मी AWARE आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं.

इंस्टाग्राम स्क्रोल करताना कधी कधी shopping pangs येतात, हेही मान्य करतो. सोशल मीडिया आहेच त्यासाठी ! शॉपिंगचा निर्णय उद्यावर ढकलला की ते pangs निघून जातात !

मी आत्ता लिहितोय आणि समोरच्या झाडावर एक पक्षी बसलाय.
Amazon, Flipkart, Instagram वगैरे त्याचं ते वासनारहित जग बघून मलाच त्याचा हेवा वाटतोय.
त्याच्या अंगावर लुई फिलिपचा शर्ट नाही. खांद्यावर Samsonite ची बॅग नाही.
‘१४० काय, माझ्याकडे तर एकही वस्तू नाही’ अशी पोस्ट लिहायची त्याला गरज वाटत नाही.आजूबाजूला वाहवा करणारे रसिक आहेत का ? माझा सूर बरोबर लागलाय का? याची पर्वा न करता तो वाऱ्यावर झुलणाऱ्या फांदीवर बसून मस्त गातोय !
गाता गाता मध्येच त्याने आत्ता माझ्याकडे पाहिलं.
Minimalism म्हणजे फक्त ‘वस्तू कमी करणं नाही’ हेच तो मला सांगत असेल का ?

2 thoughts on “माणसाला किती वस्तू लागतात ?

Leave a comment