तू सुखकर्ता ‘मी’ दुखहर्ता..

Society is not desroyed by bad people but inability of good people – Unknown

सण आणि उत्सवांबद्दल लिहायची माझी ही काही पहिली वेळ नाही. परंतु माझ्या प्रत्येक ‘व्यासपीठावर’ हा मुद्दा विविध पद्धतीने पुन्हा पुन्हा रेटून धरणे हे मी लेखक म्हणून माझे कर्तव्य समजतो. विशेषतः मागच्या आठवड्यातील वीस फुटाच्या दहीहंडी वादामुळे आणि येऊ घातलेल्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त होण्यावाचून इतर कुठलाच पर्याय समोर नव्हता. त्यासाठी पुनरुक्तीचा आरोप सहन करायची माझी तयारी आहे. कानांना भोकं पडणाऱ्या डीजेचा ‘डॉल्बी अत्याचार’ सहन करण्यापेक्षा ते कितीतरी पटींनी चांगलं !

पहिली गोष्ट म्हणजे, जुन्या परंपरा-बिरम्परा जपण्यासाठी उत्सवाच्या नावाखाली जे बकवास राजकारण चालू आहे, त्याला निदान आपण तरी बळी नको पडूया. ‘परंपरा’ नामक अक्कलखात्यावर मागच्या आठवड्यात शंभरहून अधिक गोविंदा जखमी झाले ही जबाबदारी कोणाची? माझं अख्खं बालपण उत्सवांच्या माहेरघरात म्हणजे गिरगावात गेलंय. सगळ्या उत्सवांमधला उत्साह, जल्लोष, आनंद, थरार हे मी पुरेपूर अनुभवलंय. परंतु हे सगळं ‘जीवघेणं’ कधीच नव्हतं. उत्सवांना लाखाची आणि कोटींची परिमाणं कधीच नव्हती. गोविंदाच्या मधल्या थरात उभं राहिल्यावर खांदे आणि पाय कसे लटपटतात हे मला माहित आहे. हंडी फोडताना दुसऱ्या मजल्यावरून ओतलेल्या थंड पाण्याचा जीवघेणा शहारा माझ्या मज्जासंस्थेत अजूनही ताजा आहे. पण दिवसभर गोविंदा खेळून संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये घालवायची, यातला थरार काही पचनी पडत नाही ! उत्सवांमध्ये वाद आम्हीही घातलेत आणि रात्री दोन वाजता त्याच लोकांबरोबर मांडीला मांडी लावून पावभाजी खाल्ल्ये. गणपतीविसर्जनाच्या मिरवणुकीत आम्हीही बेभान होऊन नाचलोय की !  पण ती बेभानता येण्यासाठी दारूचा सहारा घ्यावा नाही लागला ! उत्सवाचं असं डोळ्यादेखत विकृतीकरण होत जाणं हे खूप क्लेशदायक आहे. कारण सध्या ‘चांगुलपणा’ मायनॉरिटीत गेलाय आणि त्याला जबाबदार चांगली माणसंच आहेत !

आपण आत्ता फक्त महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या आपल्या – हिंदुच्याच – उत्सवांविषयी बोलूया. कारण मला आधी माझ्या घरातला पसारा आवरू दे. मगच ‘शेजारच्या’ अस्वच्छ घरावर टिप्पणी करायचा अधिकार मला असेल. महाराष्ट्रातील घरगुती उत्सवांना सार्वजनिक स्तरावर आणण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना दिलं जातं. टिळकांनी हे करणं ही त्या काळाची गरज होती. उत्सवांच्या निमित्ताने माणसं एका छताखाली येणं महत्वाचं होतं. त्या एकत्र येण्यातून ब्रिटिशांविरोधात लढा उभारायचा होता. मी-माझं-मला या कुंपणाच्या पलीकडचं जग त्यांना लोकांना दाखवायचं होतं. टिळकांना लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा परीघ वाढणे अपेक्षित होते. टिळकांना गर्दीतली ताकद हवी होती, हुल्लडबाजी नको होती. उत्सव बंद केले तर टिळकांच्या पवित्र आत्म्याला काय वाटेल, वगैरे म्हणणे केवळ हास्यास्पद नाही तर स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करणे आहे. कारण टिळकांनी त्यावेळची गरज ओळखून समाजसुधारणेसाठी ‘उत्सवाला’ फक्त एक शस्त्र म्हणून, टूल म्हणून वापरलं. आजच्या काळातली गरज विचाराल तर ते शस्त्र आज कालबाह्य झालंय. वाहतुकीवरचा ताण, पार्किंग समस्या, इंधनाची-वीजेची होणारी नासाडी, इंधन-ध्वनी प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, चेंगराचेंगरी, सुरक्षेचे प्रश्न..या सगळ्या पार्श्वभूमीवर गरजेपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊन उत्सव साजरे करावे का, हा आता खरा प्रश्न आहे. तरी अजून उत्सवांच्या मागचे राजकारण, पैशांचे खेळ वगैरे भारी गोष्टी अजून धरलेल्याच नाहीयेत ! राजकारणी लोक हे पाण्यासारखे असतात. जागा दिसली, उतार दिसला की ते घुसतात. ते संधी शोधत असतात. साप चावला तर दोष सापाला नसतो. दंश करणे हा सापाचा धर्म असतो. संधी साधून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे हा तर बहुतांशी राजकारणी नेत्यांचा ‘धर्म’ असतो. पण त्यांना घुसायला जागा न देणे, हा आपला धर्म असायला हवा. त्यामुळे राजकारणी नेते आणि भ्रष्ट समाजव्यवस्था याकडे बोट दाखवताना उरलेली चार बोटे आपल्याकडे निर्देश करतात. मग एकच पर्याय उरतो. उत्सवांचे सार्वजनिकीकरण कमी करून त्यांचे लवकरात लवकर ‘खाजगीकरण’ – ‘घरगुतीकरण’ करणे. आजच्या काळाची तीच गरज आहे. लोकमान्य असते तर त्यांनीही हे कदाचित मान्य केलं असतं.

याचा अर्थ आपली समाजाशी असलेली नाळ तोडायची का? उत्सवांचे ‘प्रायव्हेटायझेशन’ झाल्यावर त्यातला उत्साह, जल्लोष कमी होईल का?

एखादा उत्सव एकट्यानेच साजरा करायचा असेल तर त्याला ‘उत्सव’ कसे म्हणायचे ? यातील आव्हाने काय असतील ? हे सगळं वैयक्तिक स्तरावर कसं करता येईल ?

सण-उत्सव माणसाने निर्माण केले. आनंद आणि कृतज्ञता साजरे करण्यासाठी निमित्त्यं शोधली. त्यांना देव, धर्म, संस्कृती, परंपरा यांची झालर लावली. या सगळ्याचा आणखी एक उद्देश होता. माणसाला विघातक गोष्टींपासून लांब ठेवायचं. पूजा-अर्चा, कर्मकांड इतकंच काय साहित्य-संगीत-कला या सगळ्याचा एकच उद्देश होता – माणसाचे मन कुठेतरी एकाग्र करणे. तो स्वतःपासून वेगळा आहे, याची त्याला जाणीव करून देणे हाही एक उद्देश होता. त्या ‘समोरच्या’ तीरावर जाण्यासाठीचा उत्सव हा फक्त एक पूल होता. आपण मात्र त्या पूलावरच रेंगाळलो आणि समोरच्या तीरावर जायचंय हेच विसरलो. सगळा गोंधळ तिथे सुरु झाला. ‘Form over Substance’ चे स्तोम माजले. देव्हारे, फुलांच्या माळा, नैवैद्य, आरत्या, जत्रा, अभिषेक, जीर्णोद्धार या सगळ्या कोलाहालात ‘ईश्वर’ बाजूलाच राहिला. कोपऱ्यात पडून राहिलेल्या या ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. तेही उत्सवांच्या बदलत्या रुपात. हे शक्य आहे. उलट वैयक्तिक स्तरावर करणे जास्त शक्य आहे. वेळ लागेल. पण त्याचा परिणाम दूरगामी असेल. विशेषतः उगवत्या पिढीमध्ये ते सहजी झिरपायला हवंय. गरज आहे ती आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यायची. आणि माझ्या मते ते करण्यासाठी आत्ता सर्वात अनुकूल वातावरण आहे.

केदार गायकर हा माझा शाळेतला मित्र. अगदी केजी पासूनचा. त्याचा दहा दिवसांपूर्वी फोन आला. त्याच्या घरच्या गणपतीला पन्नास वर्षे झाली म्हणून त्याला यावर्षीचा गणपती वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता. त्याच्या घरच्यांनी ठरवलं, या निमित्ताने एका चांगल्या संस्थेला देणगी द्यायची. त्याने माझ्याशी चर्चा केली. तुम्हाला माझा रायकर पती-पत्नींवरील लेख आठवत असेल. तो लेख केदारने वाचला होता. घरच्यांशी चर्चा करून त्याने सुजाता रायकरांच्या ‘साथ’ या संस्थेला देणगी द्यायची ठरवली आहे. गायकर कुटुंबाच्या या निर्णयामुळे ‘थॅलीसिमिया’ हा रोग झालेल्या एका लहान मुलाला संजीवनी मिळणार आहे. गायकर कुटुंबाने ‘त्या ईश्वराच्या’ जवळ पोहोचायचा मार्ग निवडला तो असा. तुम्ही आणखी वेगळा मार्ग निवडू शकता. काहीच नाही तर, अशा उपक्रमांचे आपण स्वागत आणि कौतुक तरी करू शकतो.

हा लेख लिहिण्याचा, थोड्या प्रमाणात का होईना, एक नैतिक अधिकार मी कमावलाय. ‘मी कमावलाय’ म्हणण्यापेक्षा माझ्या पूर्ण कुटुंबाने तो कमावलाय. गेली तेहतीस वर्षे आमचे काळे कुटुंब गोकुळाष्टमीचा उत्सव खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे. ही गोष्ट वैयक्तिक असली तरी आजच्या लेखाच्या संदर्भात चपखल आहे, म्हणूनच शेअर करतोय. विशेषतः वीस फुटांच्या दहीहंडी वादामुळे गोकुळाष्टमी साजरी करण्यामुळे जो काही वाद झाला त्याला हे एक छोटेसे उत्तर असू शकेल. १९८४ साली माझ्या आईवडिलांना वाटलं, आपल्या मुलाने (म्हणजे मी) चांगले लेखक/वक्ते जवळून पाहावेत. त्यांना प्रत्यक्ष ऐकावं. तेव्हा मी सात वर्षांचा होतो. काही तरी निमित्त्य हवं म्हणून दर गोकुळाष्टमीलां आमच्या गिरगावातल्या दहा बाय दहा घरात चांगले चांगले लेखक / साहित्यिक / विचारवंत येऊ लागले. शंकर वैद्य, रवींद्र पिंगे, विद्याधर गोखले, प्रभुराम जोशी, राम जोशी, प्रवीण दवणे…यादी खूप मोठी आहे. ‘घरातल्या गप्पांचे’ स्वरूप इतके वाढत गेले की चाळीतून ब्लॉकमध्ये आलो तरी आमच्या गोकुळाष्टमीला गप्पा ऐकणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. वीस पंचवीस लोकांसमोर सुरु झालेल्या या गप्पा आता अडीचशे लोकांसमोर होतात. पार्ल्यात हॉल घेऊन हा कार्यक्रम होतो. काही वर्षांनी वानखेडे स्टेडीयम घ्यावं लागलं तरी आम्हाला आनंदच आहे. यासोबत प्रसिद्ध शिक्षक प्रभुराम जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका चांगल्या पण तुलनेने कमी माहित असलेल्या पण समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीचा ‘प्रभुराम स्मरण’ पुरस्काराने गौरव करतो. आणखी एक. हा कार्यक्रम गोकुळाष्टमीच्या जवळच्या शनिवारी किंवा रविवारी होतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक उपस्थित राहू शकतात. अडीचशे लोकांना काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं आणि एक चांगलं काम अडीचशे लोकांपर्यंत पोहोचतं. अगदी कालच – २८ ऑगस्ट रोजी – यावर्षीचा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध लेखक डॉ आशुतोष जावडेकर हे वक्ते होते. ते ‘आस्वाद: साहित्य व संगीताचा’ या विषयावर बोलले. या वर्षीचा प्रभुराम स्मरण पुरस्कार मिळाला – थॅलीसिमिया’ग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या सौ सुजाता रायकर यांना ! या सगळ्या उपक्रमाचं  श्रेय अर्थातच माझ्या आई वडिलांना जातं. त्यांनी त्यांच्या परीने, गोकुळाष्टमी या पारंपारिक उत्सवाला एक ‘समाजाभिमुख’ स्वरूप देऊन त्यांच्या मनात असलेल्या कृष्णभक्तीला एक वेगळा आयाम दिला. सात वर्षांचा असल्यापासून हा संस्कार माझ्यात कुठेतरी झिरपला आणि त्यामुळे मी आणि माझी पत्नी आता आईबाबांसोबत राहून त्यांची परंपरा पुढे चालवत आहोत. यात महत्व आहे ते आईबाबांच्या तेहतीस वर्षांपूर्वी दाखवलेल्या दाखवलेल्या धाडसाला आणि त्या उपक्रमातील सातत्याला ! मनात आणलं तर उत्सवाचे स्वरूप किमान वैयक्तिक स्तरावर बदलता येते, हे आम्ही काळे कुटुंबीय अभिमानाने आणि सप्रमाण सांगू शकतो. आणि जर आमच्यासारखे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब करू शकते, तर ते कोणालाही करणे शक्य आहे.

असे बदल एका रात्रीत घडत नाहीत. उलट असे बदल हळूहळू घडले तरच ते अधिक परिणामकारक असतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. समाजाच्या एकूण पिरॅमिडचा विचार करता, धार्मिक उत्सवांच्या बाबतीत असे प्रयोग करणारे फारच थोडे असतील याचीही कल्पना आहे. पण तरीही  कुठेतरी सुरुवात करावीच लागेल.

वसंतराव देशपांड्यांनी गायलेले एक प्रसिद्ध भक्तीगीत आहे. तू सुखकर्ता | तू दुखहर्ता || तूच कर्ता आणि करविता…

बदलत्या काळात या गीताचे शब्द बदलावे लागतील.

तू सुखकर्ता | ‘मी’ दुखहर्ता |… मीच कर्ता | तूच करविता ||

Prayers don’t change things. Paryers change people and people change things..हेच सत्य आहे. ‘तो’ आपणहून मखरातून बाहेर येणार नाहीये. आपण सगळ्यांनी मखरात बसलेल्या ‘त्याचे’ हात बनायची वेळ आली आहे. ते करण्यासाठी ‘त्याचा’ फक्त आशिर्वाद असू दे !

हल्लीच्या उत्सवांच्या संदर्भात एक अत्यंत ‘जीवघेणा’ शेर आहे.

ये सारे शहर मे दहशत सी क्यों हैं |  यकीनन कल कोई त्योहार होगा !

राजेश रेड्डींचा हा शेर पुढच्या पिढीला ‘कालबाह्य’ वाटावा यासाठी कामाला लागू या…

बोला गणपती बाप्पा sssss मोरया !!

 

 

26 thoughts on “तू सुखकर्ता ‘मी’ दुखहर्ता..

    1. Dhanywad Niranjan. प्रत्येक लेखावर आपल्या प्रतिक्रिया मिळतात. परंतु दर वेळी उत्तर देणे शक्य होत नाही. वेळ काढून आपण माझे लेखन वाचता याबद्दल आपले मनापासून आभार.

  1. Even if this observation is correct I still feel sarwajanik utsav ani sankhya hyaa sadhya garjechya zalya Ahet .tyacha rangroop badloon tyanna changli zalar laavuya pan kami karna impossible
    Ani shejaar cha ghar saaf thevat nasel tar unfortunately aaplyala te saaf karav lagel
    any sgggestions……

  2. फारच सुंदर तऱ्हेने उत्सव कसा साजरा करावा कि ज्याने सर्व समाजाचे प्रबोधन होइल ह्या गोष्टी आपण ह्या लेखात मांडल्या आहेत. मी आपल्या प्रत्येक लेखाचा आस्वाद आनंदाने घेतो.आपण असेच सुंदर, सोपे आणि प्रबोधनत्मक लेख लिहित रहा .

  3. नविन फारच छान लेख. पूर्वीप्रमाणे ” एक गाव-एक पाणवठा ” या प्रमाणे ” एक गाव – एक गणपती ” आशारितीने गणेशोत्सव साजरा व्हावयास हवा. गल्लोगल्लीतील गणेशोत्सवाऐवजी प्रत्येक गावाचा एकच गणपती हवा. प्रत्येक ऊत्सवाला एक विकृत वळण लागतेय ते सर्वांनी मिळूनच थांबवायला हवेय.
    तुमचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. अभिनंदन व धन्यवादही. !
    रणजित काळे

  4. Khup chhan aani marmik aani relate pun zaley khup karan hya saglya utsavamadhe active participation ghetalelya mala sadhyache swarup baghun alipt rahaney aawadtey hyatach sarv kahi aaley.

  5. really osssmm.. and true article about today’s festivals…and celebration style..I think it becomes competition between people not sharing..Thanks Navin Sir

  6. Navinji tumcha pratyek lekh me parar parat wachate.
    Sagale lekh manala khupach bhavtat. Asech uttarottar anek lekh amhala vachayala miltil yat shanka nahe.

  7. अभिनंदन! मनाला भिडणारा , पटणारा एक उत्तम लेख!! हे विचार उन्मादी समाज पटवून घेईल का हा खरा प्रश्न आहे.

  8. Hi Navin,
    अप्रतिम लेख!!!
    सुंदर विचार मांडला आहेस आणि तेही अगदी सहज आोघवत्या भाषेत!!! आत्ता पर्यंतचे तुझे सर्वच लेख खूप आवडले.
    Keep writing… Looking forward to many more Articles by You….
    Best Regards!!!

  9. नवीन ,
    सस्नेह
    लेख वाचला.
    मलाही आमच्या सार्वजनिक
    उत्सवांबाबत असेच वाटत
    आले आहे. मोडकळीला आलेल्या
    कुटुंबव्यवस्थेला सावरण्यासाठी आता
    गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येणं
    जास्त गरजेचं आहे. रस्त्यावरच्या गणपतींची गर्दी
    झालीय. सार्वजनिक पुजायचेच असतील तर एक गाव
    एक पाणवठा या धर्तीवर एक गाव एक गणपती व्हावा.
    शुभेच्छा.
    दत्ताराम देसाई.
    गोवा

Leave a comment